पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत भाजपा नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

Foto
नवी दिल्ली - आगामी राज्यसभा निवडणुकींबाबत दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ जूनला राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी महत्त्वाची बैठक घेत आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान निवासस्थानी भाजपाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, नितीन गडकरी यांच्यासोबत इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी ५.३० वाजता ही बैठक होणार आहे. त्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांबाबत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाईल. सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार कल्याणकारी आणि जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचाही बैठकीत आढावा घेतला जाईल. १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी १८ जूनला निवडणूक होत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथे प्रत्येकी ४ जागा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी ३ जागा, झारखंडमध्ये २, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझारोम याठिकाणी प्रत्येकी १ जागा राज्यसभेत रिक्त होत आहे. २२ मे रोजी आयोगाने राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले होते.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार १ जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि १८ जून रोजी मतदान होईल. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. आयोगाने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी राज्यसभेच्या पोटनिवडणुकाही जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि नुकतेच तामिळनाडू विधानसभेवर निवडून आलेले एआयएडीएमकेचे खासदार सी. व्ही. षण्मुगम यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी १८ जून रोजी पोटनिवडणूकही होणार आहे. याशिवाय बिहार आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकाही नियोजित आहेत. या निवडणुका लक्षात घेता भाजपा सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समीकरणांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते असे मानले जाते.